शाळेची संस्मरणीय सहल

शाळेची संस्मरणीय सहल 


    नमस्कार! माझे नाव किमया चिटणीस. मी इयत्ता सहावीत शिकत आहे . मी गेली आठ वर्ष Wisdom World School, Hadapsar या शाळेची विद्यार्थिनी आहे. कोरोनाचा काळ सोडला तर दर वर्षी शाळा आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला (excursion) घेऊन जाते . 
    या वर्षी आम्ही 'निराली ढाणी' या ठिकाणी गेलो होतो. 'ढाणी' या शब्दाचा राजस्थानी अर्थ आहे छोटासा कसबा! 'निराली ढाणी' हि एक दिवसीय सहलीसाठी खूप छान जागा आहे. राजस्थानी संस्कृती आणि साहसी खेळ यांचा तिथे एकत्र अनुभव घेता आला. 
    २३ सप्टेंबरचा सोमवार हा माझ्यासाठी वेगळा आणि उत्साही होता. शाळेची बस आम्हा सगळ्याना घेऊन सकाळी आठ वाजता निघाली. खरं तर मला बस प्रवासाची जरा भिती वाटते पण त्या दिवशी मित्र-मैत्रिणीं सोबत वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. आमच्या वर्गशिक्षिका इलहम मॅम पण आमच्या सोबत बसमध्ये मजा करत होत्या. त्यांनी छान गाणी लावली होती. 
    सहलीच्या ठिकाणी पोहोचल्यावर मला तर प्रचंड भूक लागली होती. गरमा-गरम पोहे आणि इडलीची चव मस्त होती. नाश्त्यानंतर आम्ही आमचे लक्ष विविध खेळांवर केंद्रित केले. VR Box (Virtual Reality) चा खेळ ठिक होता पण मला शारीरिक खेळ जास्त आवडतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे साहसी खेळ होते - उंच दोरीवरून चालणे, हलणाऱ्या ठोकळ्यांवरून  चालणे वगैरे. धनुष्य-बाणाच्या खेळासाठी खूप मोठी रांग असल्यामुळे मी तिकडे गेलेच नाही. नंतर त्यांनी आम्हाला चंद्रयान-२ मोहिमेची एक फिल्म दाखवली. एवढे खेळ खेळल्यानंतर आम्हाला भूक लागणे साहजिकच होते. त्यामुळे जेवण तिखट आहे कि नाही ह्याचा फारसा विचार न करता मी तेथील पदार्थांवर ताव मारला. मला पोटभर जेवताना बघून माझी आई नक्कीच खूष झाली असती! 
    जेवणानंतर मी खूप दमले होते पण तरीही मैत्रिणींसोबत जादूचे प्रयोग बघितले. त्यानंतरच्या मातीच्या वस्तू बनविण्याच्या (Pottery) कार्यक्रमाला मी जरा कंटाळलेच होते. सगळ्यात शेवटी मी एक सुंदरसा फुलपाखराचा टॅटू माझ्या हातावर काढून घेतला. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. अर्थात त्या आधी DJ डान्स तर झालाच! 
    परतीच्या प्रवास माझ्या पेक्षा माझ्या मित्र-मैत्रिणींसाठी जास्त मजेशीर होता. त्यांनी मला झोपू न देण्याचा चंग बांधला होता. जरी मी खूप थकले होते, पण तरीही हा दिवस संपूच नये असे मला वाटत होते. सोमवार इतका आनंदात जाऊ शकतो याचा हा सुखद संस्मरणीय अनुभव होता. शाळेने आम्हाला वर्षातून किमान दोनदा तरी अशा सहलीला न्यायला हवे, हो कि नाही?
- किमया चिटणीस , 6F        

Comments

Popular posts from this blog

marathi article - the serpent's revenge book review

Shivjayanti Speech 2026