marathi article - the serpent's revenge book review
पुस्तक अभिप्राय - द सर्पांट्स रिवेंज (सर्पाचा सूड)
मला वाचनाची खूप आवड आहे आणि विशेषतः पौराणिक कथा मला खूप आवडतात. माझ्या आजीने मला सुधा मूर्ती यांचे 'द सर्पन्ट्स रिव्हेंज – अनयुझ्युअल टेल्स फ्रॉम द महाभारत' नावाचे पुस्तक भेट दिले. या शीर्षकाचा अनुवाद आहे 'सर्पाचा सूड - महाभारतातील न ऐकलेल्या कथा'. सुरुवातीला, मला ते आवडेल की नाही याची खात्री नव्हती. पण जसजसे मी त्यातील कथा वाचत गेले, तसतसे ते पुस्तक अधिकच मनोरंजक वाटू लागले आणि नकळतपणे माझे लक्ष त्यात गुंतले.
हे पुस्तक महाभारतासारख्या सुप्रसिद्ध प्राचीन महाकाव्यावर आधारित आहे, परंतु त्यात सांगितलेल्या कथा फारश्या प्रसिद्ध नाहीत. प्रत्येक कथा मनोजरंजक तर आहेच पण कधीकधी आश्चर्याचे धक्के देखील देते. कथेच्या शेवटी, लेखिका त्या कथेबद्दल काहीतरी खास लिहितात. त्या कथेत घडलेल्या घटनेशी संबंधित ठिकाण, सध्याचे उत्सव किंवा समाजावरील परिणाम यांसारखी माहिती त्या देतात. हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य आहे आणि असे मी आजपर्यंत इतर कोणत्याही पुस्तकात पाहिलेले नाही.
माझी आवडती कथा भीमाचा नातू बर्बरीक याची आहे. ही कथा त्याच्या तीन शक्तिशाली बाणांबद्दल आणि त्याने केलेल्या त्यागाबद्दल आहे. अविचाराने आणि घाईत घेतलेल्या शपथा कशा विनाशाकडे नेऊ शकतात, हे ही कथा आपल्याला सांगते.
कथा कालक्रमानुसार मांडलेल्या आहेत. हे पुस्तक मनुष्याचे कर्तव्य आणि आपल्या कर्मांचे भावी पिढ्यांवर होणारे परिणाम यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करते.
मी सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचायचा नक्कीच आग्रह करेन. हे आपल्या संग्रही ठेवण्यासारखे खूप दर्जेदार पुस्तक आहे.
"जसा व्यायाम तसे शरीर, जसे वाचन तसेच मन"
"पुस्तकाची पाने उलटताना, मनाची पानेही उलगडत जातात."
Comments
Post a Comment