Shivjayanti Speech 2026
शिवाजी महाराज - 'ध्येय, धैर्य आणि धाडस' - एक आदर्श
निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी!
नमस्कार, मी किमया चिटणीस , आज आपल्या समोर शिवजयंतीच्या पवित्र निमित्ताने बोलायला उभी आहे.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रायरेश्वरासमोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतानाच शिवरायांनी आपले ध्येय निश्चित केले होते. शिवराय एक धैर्यशील, धाडसी व प्रजाहितदक्ष राजे होते. त्यांनी दाखवून दिले कि कमी सैन्य असले तरी बुद्धीच्या जोरावर मोठ-मोठ्या साम्राज्यांना देखील हरवता येते.
सर्व प्रथम बोलूया गनिमी काव्या विषयी. गनिमी कावा म्हणजे छोट्या-छोट्या टोळ्यांनी झटपट हल्ला करणे, शत्रुला गोंधळात टाकणे आणि नंतर डोंगर-जंगलात लुप्त होणे. हे युद्ध फक्त ताकदीचे नव्हे तर युक्तीचे आणि धाडसाचे होते. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी आणि मावळ्यांच्या धैर्याने हे साध्य झाले.
याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे - प्रतापगडाची लढाई! विजापूर दरबारचा अफझल खान मोठ्या फौजेनिशी महाराजांना संपवायला आला होता. पण महाराजांनी थेट युद्ध करणे टाळले. त्यांनी खानाला भेटीचे आमंत्रण दिले. असे भासविले कि खान खूप मोठा आहे आणि आपण सर्वच बाबतीत लहान. भेटीत अफझल खानाने दगा देऊन हल्ला केला, पण शिवराय तयार होते! त्यांनी वाघनखांनी खानालाच फाडले. त्यानंतर डोंगरात लपलेल्या मावळ्यांनी अचानक हल्ला करून शत्रूच्या सैन्याला उध्वस्त केले. हाच गनिमी कावा - कमी नुकसानात मोठा विजय! शत्रूचे मर्म ओळखून युक्तीने त्यावर प्रहार करणे. पुढे शाइस्ते खानाला देखील याचा सामना करावा लागला आणि पुणे सोडून पळून जावे लागले.
दुसरे महत्वाचे आहे किल्ल्यांचा योग्य उपयोग! महाराजांनी शेकडो किल्ले बांधले. कित्येक जिंकून घेतले. राजगड, रायगड, प्रतापगड, सिंहगड ...हे काही विलासी महाल नव्हते. तर हे स्वराज्याचे रक्षक होते. महाराजांनी सह्याद्रीची दुर्गमता आणि गनिमी कावा ह्याचा विचार करून हे खास बांधून घेतले होते.
शिवरायांनी केवळ सह्याद्रीचा नाही तर अरबी समुद्राचा देखील पुरेपूर उपयोग करून घेतला. त्यावेळी हे खूप धैर्याचे काम होते. परकीय आक्रमणे समुद्र मार्गाने होतील आणि त्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर समुद्रावर स्वराज्याची हुकूमत असणे गरजेचे आहे हे महाराजांनी जाणले होते. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि रायगड - या किल्ल्यांनी कोकण किनारपट्टी सुरक्षित केली. शिवरायांच्या या धैर्यशील दूरदृष्टीमुळेच मराठा नौदलाची स्थापना झाली. आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखते.
आपण विद्यार्थी यातून नेतृत्व, धैर्याचे आणि नीतिमत्तेचे काय धडे घेऊ शकतो ?
- आव्हानांना धैर्याने सामोरे जा - हजारो-लाखोंचे सैन्य आले तरी महाराज मनाने कधी हरले नाहीत.
- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ - अफझल खान, शाइस्ते खान यांना शिवरायांनी युक्ती ने चीत केले. केवळ शक्ती वापरून नाही.
- कायद्याचा सन्मान - राजा असो किंवा साधी प्रजा - नियम सर्वांना लागू होतात. महाराजांनी गावच्या पुढाऱ्याला सुद्धा गैर वर्तनाबद्दल शिक्षा केली.
- सर्वांचा आदर - महाराजांनी शत्रूच्या प्रदेशातील जनतेला किंवा त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना कधी त्रास दिला नाही. त्यांचा आदर केला. नीतिमत्ता कायम राखली पाहिजे.
आपले शिवरायांवरील प्रेम आणि आदर केवळ आजच्या दिवसापुरता मर्यादित न ठेवता त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्याचे पालन सर्वतोपरी केले पाहिजे.
हर हर महादेव!
जय भवानी! जय शिवाजी!
Comments
Post a Comment